सिरपुरबांधः-
नरेंद्र मोदी सरकारनं सामान्य नागरिकांसाठी स्वामित्व योजना आणली आहे. या योजनेविषयी 2021 सालचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं, “स्वामित्व योजना आता देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये राबवली जाणार असून यामुळे ग्रामीण नागरिकांना त्यांच्या घराचं आणि जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे. “ पण, प्रॉपर्टी कार्ड नेमकं काय असतं? त्याचे फायदे काय आहेत? याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. प्रॉपर्टी कार्ड ज्यापद्धतीनं साताबारा उताऱ्यावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिगर शेतजमीन आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते.म्हणजे काय तर बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 ऑक्टोबर 2020 रोजी स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचं वितरण केलं होतं.डिजिटल स्वाक्षरीत असल्यामुळे हे प्रॉपर्टी कार्ड शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरता येईल, असं सरकारी अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं.“आता प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात जायची गरज पडणार नाही. स्थावर मालमत्तेवर होणाऱ्या व्यवहाराची नोंद प्रॉपर्डी कार्डवर ठेवली जाणार आहे. आतापर्यंत राज्यातल्या 1165 गावांचा ड्रोन सर्व्हे झाला असून, राज्यातल्या सगळ्या गावांमधील ड्रोन सर्व्हे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. या माध्यमातून सामान्य माणूस बँकांकडून कर्जही घेऊ शकेल,” असंही त्यांनी सांगितलं.