🔷13 विरुध्द 39 मते घेत भाजपचे सर्व सभापती विजयी, राष्ट्रवादीची माघार
🔷अर्जुनी मोरगाव मतदारसंघाला अध्यक्षासंह २ सभापतीपद”
साखरीटोला/गोंदिया-:
गोंदिया जिल्हा परिषदेच्या 4 विषय समितीकरीता आज 10 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे 4 ही उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी 13 तर भाजपच्या उमेदवारांना 39 मते मिळाली (भाजप 26, चाबी 4, अपक्ष 2 व राष्ट्रवादी 8) अशी 40 मते होती विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अर्जुनी गटाचे जिल्हा परिषद सदस्य चत्रुभूज बिसेन यांनी मतदानाचा हक्क न बजावता नाराजी दर्शवल्याचे वृत्त येत आहे. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत व सहयोगी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुतीरकर यांनी काम पाहिले. आज झालेल्या विषय समितीच्या निवडणुकीत मुंडीपार गटाचे जिल्हा परिषद सदस्य डाॅ. लक्ष्मण भगत, पिंडकेपार जिल्हा परिषद गटाच्या दिपा चंद्रिकापूरे, इटखेडा गटाच्या अपक्ष जि.प.सदस्य पौर्णिमाताई ढेंगे महिला बालकल्याण सभापती पदावर तर समाजकल्याण सभापती पदावर तिरोडा तालुक्यातील सरांडी जि.प.गटाच्या रजनीताई कुंभरे या निवडूण आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिला बालकल्याण विषय समितीकरीता नेहा केतन तुरकर, व इतर दोन विषय समितीकरीता किरण पारधी, व जगदिस बावनथडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नमते घेत सादर केलेले 3 विषय समितीचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून समाजकल्याण विषय समितीकरीता उषा शहारे, महिला बालकल्याण समितीकरीता विमल कटरे, व इतर दोन विषय समितीकरीता जितेंंद्र कटरे, व छाया नागपूरे, यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
भंडारा जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिलेल्या झटक्याचा बदला गोंदिया जि.प.च्या विषय समिती निवडणूकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे भाजप सदस्य उपाध्यक्षाच्या निवडणूकीतच राष्ट्रवादीच्या बाजूने नव्हते, परंतु वरिष्ठांच्या आदेशावर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक एकत्र लढले. पण आज झालेल्या विषय समिती निवडणूकीत भाजपने बहुमताच्या बळावर राष्ट्रवादीला मात्र दूर ठेवले असून विषय समिती वाटप करतांना उपाध्यक्षाकडे आरोग्य व शिक्षण हे पद कायम राहते की कृषी व पशुसंवर्धन हे दिले जाते याकडे लक्ष लागले आहे.
