🔷30 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर शेतीला पानी, आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नाला यश
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी उपसा सिंचन प्रकल्प कोट्यावधी रुपये खर्च होऊन 30 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पूर्ण झाला असून शेतकऱ्यांनीं पहिल्यांदाच 200 एकर शेतीत रब्बीचे धान पीक लावून मोठा आनंद व्यक्त केला आहे. सालेकसा तालुक्यातील पांढरवाणी उपसा सिंचन योजनेत 90% टक्के लाभार्थी आदिवासी शेतकरी आहेत. त्यांना अनेक वर्षे पाण्यासाठी वाट पहावी लागली. मात्र आमदार संजय पुराम यांच्या सतत पाठपुरावा व प्रयत्नातून अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पातून शेकडो शेतकऱ्यांना पहिल्यांदाच उन्हाळी धान पिकाकरिता पाणी देण्यात आले आहे.
आदिवासी क्षेत्र साधारणपणे डोंगराळ असल्याने आणि कालिसरार धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्याने आदिवासी शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी सन 1992-93 मधे भाजप-सेना युतीच्या कालखंडात तत्कालीन पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. महादेवरावजी शिवणकर यांनीं प्रस्ताव सादर केले होते. आणि शासनाकडून 100% टक्के खर्चावर अतीदुर्गम क्षेत्रातील पांढरवाणी उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आले होते हे उल्लेखनीय आहे.
तत्कालीन भाजप-सेना युतीच्या कालखंडाच 80%टक्के बांधकाम पूर्ण झाले होते आणि सरकार बदलल्यानंतर 20% टक्के काम पूर्ण करण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना 30 वर्ष दीर्घ प्रतीक्षा करावे लागले. उशीजवळ पाणी असूनही शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही, ही शोकांतिका लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी आमदार संजय पुराम यांनी पाटबांधारे विभागास बंद पडलेले प्रकल्प सुरू करण्यास प्रवृत्त केले. या सिंचन प्रकल्पातून पांढरवाणी परिसरातील सुमारे 82 हेक्टर शेती सुजलाम् सुफलाम् झाली. यंदा 200 ऐकर उन्हाळी धान पीक लागले आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नती साधण्यास मदत झाली आहे. सन 1992-93 मध्ये सालेकसा तालुक्याच्या पांढरवाणी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वरथेंबी पावसावर अवलंबित शेतीला सिंचनासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून कालीसराड धरणावरील उपसा सिंचन योजनेला 74 लाख 34 हजार रुपयेची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु थोडया फार कामामुळे शेतकऱ्याना पाणी मिळत नव्हते. तेव्हा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी बाघ इटीयाडोह विभाग गोंदियाचे कार्यकारी अभियंता कुरेकर, बाघ व्यवस्थापन उपविभागचे उपविभागीय अभियंता डोंगरे, शाखा अभियंता कस्तुरे यांचेशी चर्चा केले व पांढरवाणी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्यात आले आहे. सद्यःस्थितीत पांढरवाणी उपसा सिंचनासाठी कालिसरार धरणावर 61 एचपी क्षमतेच्या दोन मोटार बसविण्यात आल्या आहे. 36 आऊटलेटचे काम पूर्ण झाले आहे. उपसा सिंचन योजना, हा प्रकल्प शेकडो आदिवासी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. 30 वर्षानंतर पहिल्यांदाच उन्हाळी धान पीकासाठी पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी आमदार पुराम यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
