गोंदिया, दि. 3 : दिवाळी व सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांच्या वतीने जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ६५ अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी करण्यात आली असून, सुमारे १० लाख ९० हजार रुपये किंमतीचा ४ हजार ६८५ किलोहून अधिक अप्रमाणित व असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ३६ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या, तर ६ प्रकरणांमध्ये तडजोड कारवाई करण्यात आली. त्यातून ७३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तपासणीदरम्यान ५५ अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, काही नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
घरगुती फराळ विक्रेत्यांनाही FSSAI नोंदणी अनिवार्य
दिवाळीच्या काळात महिला बचतगट, गृहउद्योग तसेच वैयक्तिक विक्रेत्यांकडून चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, करंजी आदी फराळ पदार्थांची विक्री केली जाते. घरगुती स्तरावर खाद्यपदार्थ तयार करून दुकानातून, ऑर्डरनुसार किंवा सोशल मीडिया व ऑनलाइन माध्यमातून विक्री करणाऱ्यांनाही अन्न सुरक्षा व मानके अधिनियम लागू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
त्यानुसार प्रत्येक घरगुती फराळ विक्रेत्याने ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ “फुड सेफ्टी ॲन्ड स्टॅन्डर्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया” (FSSAI) नोंदणी किंवा आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. १ एप्रिल २०२६ पासून छोट्या अन्न व्यावसायिकांसाठी नोंदणीची वार्षिक उलाढाल मर्यादा १.५ कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. त्यापुढील उलाढालीनुसार राज्य किंवा केंद्रीय परवाना घेणे आवश्यक आहे. यासाठी ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ “फुड सेफ्टी ॲन्ड स्टॅन्डर्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया” (FSSAI) च्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करता येतो.
फराळाच्या पाकिटावर उत्पादनाचे नाव, उत्पादकाचे नाव व पत्ता, “फुड सेफ्टी ॲन्ड स्टॅन्डर्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया” (FSSAI) नोंदणी किंवा परवाना क्रमांक, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम मुदत, घटकांची यादी आणि निव्वळ वजन नमूद करणे आवश्यक आहे. ऑनलाइन विक्रीच्या जाहिरातीतही परवाना क्रमांक नमूद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अन्न व्यावसायिकांनी स्वच्छता व गुणवत्ता नियमांचे पालन करावे
चकली, चिवडा, नमकीन, मिठाई उत्पादक तसेच खाद्यतेल रिपॅकिंग करणाऱ्या व्यावसायिकांनी कच्चा माल परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा. तळण्यासाठी तेलाचा वारंवार वापर टाळावा. कच्चा व तयार अन्नपदार्थ स्वच्छ, हवेशीर आणि किटकमुक्त ठिकाणी साठवावेत. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छ कपडे, ॲप्रन, हेअरनेट, मास्क व हातमोजे वापरणे आवश्यक आहे.
उत्पादन परिसर, भांडी व यंत्रसामग्रीची नियमित स्वच्छता करावी. पॅकबंद पदार्थांवर आवश्यक लेबलिंग करावे. प्रतिबंधित रंगांचा वापर करू नये. वैध “फुड सेफ्टी ॲन्ड स्टॅन्डर्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया” (FSSAI) परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करावे. कच्च्या मालाच्या खरेदी पावत्या, पाणी तपासणी अहवाल व किटक नियंत्रणासंबंधी अभिलेख अद्ययावत ठेवावेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
विनापरवाना व्यवसाय करणे, सुधारणा नोटीसनंतरही त्रुटी दूर न करणे, निकृष्ट किंवा असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री करणे अशा प्रकरणांत परवाना निलंबन किंवा रद्द करणे, अन्नसाठा जप्त करून नियमानुसार नष्ट करणे, दंड आकारणे तसेच न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर अधिक कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी फराळ व इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना पाकिटावरील “फुड सेफ्टी ॲन्ड स्टॅन्डर्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया” (FSSAI) क्रमांक, उत्पादन दिनांक आणि वापरण्याची अंतिम मुदत तपासूनच खरेदी करावी. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्न व्यवसाय चालकांची गय केली जाणार नाही. जिल्ह्यात नियमित तसेच आकस्मिक तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, गोंदिया यांनी कळविले आहे.



