‘एक देश, एक निवडणूक’ आवश्यक; मात्र लोकशाही अधिक सशक्त होण्यावर युवकांचा भर

जिल्हास्तरीय युथ पार्लमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी मांडली अभ्यासपूर्ण मते; निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा आणि संविधानिक तरतुदींवर चर्चा                                                                                                                                                                                          गोंदिया, दि. 3 : ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना देशाच्या दृष्टीने आवश्यक असली, तरी तिच्या अंमलबजावणीसोबत लोकशाही अधिक सशक्त राहणे, सर्व स्तरांतील नागरिकांचे प्रतिनिधित्व आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असा सूर जिल्हास्तरीय युथ पार्लमेंटमध्ये उमटला. या विषयावर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपली मते मांडत निवडणूक सुधारणांच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण चर्चा केली.
केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत मेरा युवा भारत, गोंदिया यांच्या वतीने एस. एस. गर्ल्स महाविद्यालयात जिल्हास्तरीय युथ पार्लमेंटचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागाचे उपसंचालक सौरभ कुमार निषाद यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयाच्या अनुषंगाने आपले विचार मांडले. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे खर्च होणारा वेळ, पैसा आणि मनुष्यबळ वाचविण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते. मात्र, तिची अंमलबजावणी करताना लोकशाहीतील सर्व घटकांचे महत्त्व आणि नागरिकांचे प्रतिनिधित्व कायम राहावे, यासाठी संविधानात आवश्यक त्या सुधारणा नियमानुसार व्हाव्यात, अशी मते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश शुक्ला यांनी युवकांना आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहून सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. इच्छित ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्नशील राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी सालेकसा येथील अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य एस. नारायण मूर्ती यांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करून आपली मते प्रभावीपणे मांडावीत, असे सांगितले. तसेच आपल्या मताधिकाराचे महत्त्व ओळखण्याचे आवाहन केले. एस. एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या प्राचार्य शारदा महाजन यांनी जिल्ह्याच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या युवक-युवतींचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. युवकांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या स्पर्धेसाठी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर, राजीव गांधी सोशल वर्कर कॉलेजच्या श्रीमती संगीता घोष, माजी प्राध्यापिका दीप्ती चौरागडे, कंटेंट क्रिएटर राहुल वर्मा आणि ब्रिजेश गजभिये यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातील त्रुटी निदर्शनास आणून देत विषयाची मांडणी अधिक प्रभावी करण्यासाठी कोणते मुद्दे समाविष्ट करता येतील, याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. दीप्ती चौरागडे यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाची सद्यस्थिती स्पष्ट करत हे विधेयक लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) विचाराधीन असून त्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. तसेच अशा विधेयकांची शासनस्तरावर होणारी प्रक्रिया आणि त्यातील विविध टप्प्यांविषयी वस्तुनिष्ठ माहिती दिली.
कंटेंट क्रिएटर राहुल वर्मा यांनी स्वतःच्या प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. युवकांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा दिल्यास त्यातून करिअरच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. संगीता घोष यांनी जिल्हास्तरीय निकाल जाहीर करून निवडून न आलेल्या विद्यार्थ्यांनीही चांगला प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एस. एस. गर्ल्स महाविद्यालयाच्या ईश्वरी खटवानी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजश्री वाघ यांनी केले, तर आभार प्रा. दिशा गेडाम यांनी मानले. कार्यक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ‘एक देश, एक निवडणूक’ आवश्यक; मात्र लोकशाही अधिक सशक्त होण्यावर युवकांचा भर, ID: 31262

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर